Railway Income:  प्रवाशांना आरामदायी आणि सुखकर प्रवासासाठी रेल्वेकडून अनेक योजना आणल्या जात आहेत. अलीकडेच रेल्वेने विनातिकिट प्रवास करणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळं इतर प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळंच रेल्वेने अशा प्रवाशांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. उपनगरीय लोकल, मेल एक्स्प्रेस, विशेष ट्रेन यासारख्या ट्रेनमध्ये आता टीसीकडून तिकिटांची तपासणी करण्यात येते. अशावेळी जर एखादा व्यक्तीकडून प्रवाशांना त्रास होत असेल किंवा कोणी नुकसान पोहोचवत असेल तर रेल्वेकडून कठोर कारवाई करण्यात येते. तसंच, विनातिकिट प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेने एप्रिल ते मे 2024 या दोन महिन्यात अनधिकृत आणि विनातिकिट प्रवास करणारे 9.04 लाख प्रकरणांमध्ये 63.62 कोटींचा दंड वसूल केला आहे. त्यामुळं रेल्वेच्या महसुलात 14.67% वाढ झाली आहे.  मे 2024च्या दरम्यान, मध्य रेल्वेने अनधिकृत आणि अनियमित प्रवाशांकडून 4.29 लाख प्रकरणात 28.44 कोटींचा दंड वसूल केला आहे. यामुळं 2.54 टक्क्यांचा महसूल मिळवला आहे. 


एप्रिल ते मे-2024 या कालावधीतील उत्पन्न आणि प्रकरणांचा विभागनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे.


मुंबई विभागाला 4.07 लाख प्रकरणांमधून 25.01 कोटी रुपये मिळाले.
भुसावळ मंडळाला १.९३ लाख प्रकरणांमधून १७.०७ कोटी रुपये मिळाले.
नागपूर विभागाला 1.19 लाख प्रकरणांमधून 7.56 कोटी रुपये मिळाले.
सोलापूर विभागाला 54.07 हजार प्रकरणांमधून 3.10 कोटी रुपये मिळाले आहेत.
पुणे विभागाला ८३.१० हजार प्रकरणांमधून ६.५६ कोटी रुपये मिळाले आहेत.
46.81 हजार प्रकरणांमधून मुख्यालयाला 4.30 कोटी रुपये मिळाले.


दरम्यान, मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेलाही फुकट्या प्रवाशांकडून लाखो रुपयांचा दंड वसुल केला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात दोन महिन्यांत 2.80 लाख लोकांकडून तिकिट किंवा बॅगेज तिकीट न घेता प्रवास करणाऱ्यांकडून एकूण 17.19 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच उपनगरीय विभागातील 1 लाख लोकांवर कारवाई करण्यात आली असून 4.71 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एसी लोकल गाड्यांमध्येही अचानक तपासणी करून ८५०० लोकांवर कारवाई करून २९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.