मुंबई: मध्य रेल्वेवरील सर्व फलाटांच्या उंचीचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.  एकूण २५९ फलाटांची उंची ही आवश्यकतेनुसार ९०० ते ९२० मिमी एवढी वाढवण्यात आली. त्यामुळे फलाटांमधील दरींमुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहे. यापूर्वी पश्चिम रेल्वेवरील सर्व फलाटांची उंचीही वाढवण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फलाट आणि लोकलमधील धोकादायक अंतरामुळे प्रवाशांना भेडसाव्या लागणाऱ्या समस्येची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही रेल्वेच्या प्रशासनाला फलाटांची उंची वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून एक समिती नेमण्यात आली आणि तिच्या शिफारशीनुसार फलाटांची उंची ७६० ते ८४० मिमीवरून ९०० मिमी इतकी वाढवण्यात आली. यानंतर पश्चिम रेल्वेने साधारण वर्षभरात सर्व फलाटांची उंची वाढवण्याचे काम पूर्ण केले होते. मात्र, मध्य रेल्वेवरील फलाटांची उंची वाढवण्याचे काम बराच काळ बारगळले होते. 


पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावरील अनेक फलाट आणि लोकलमधील सुमारे १०० मिमी इतके अंतर होते. लोकलमध्ये शिरताना वा उतरताना प्रवासी या गॅपमध्ये पडून जखमी वा मृत होण्याचे अनेक दुर्घटना घडल्या. ११ जानेवारी २०१४ रोजी घाटकोपर स्थानकात लोकल पकडत असताना तोल सुटल्याने मोनिका मोरे या तरुणीस हात गमवावे लागले होते. त्यानंतर लोकल आणि फलाटामधील गॅपवरून रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठली होती.