मुंबई :  मध्य रेल्वे मार्गावरून कुर्ला रेल्वे स्टेशनवरून कल्याणच्या दिशेने पहिली लोकल रवाना करण्यात आलीय. कुर्ला - सायन परिसरातही पाणी साचल्यानं मध्य रेल्वे मार्गावरही अप आणि डाऊन वाहतूक बंद पडली होती. त्यामुळे मुंबईकरांचा एकच खोळंबा झाला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसानं आपला जोर कायम ठेवल्यानं दुपारी ०२.०० वाजल्याच्या सुमारास वाशी ते सीएसएमटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झालीय. टिळनगर भागात रुळांवर पाणी साचल्यानं लोकल सेवा रद्द करण्यात आल्याची घोषणा रेल्वे स्टेशनवर करण्यात येतेय. 


दादर आणि कुर्ला रेल्वे स्टेशनवरील वाढती गर्दी लक्षात घेवून महापालिकेच्या वतीनं दादर आणि कुर्ला भागातील पालिका शाळांमध्ये रिलिफ कॅम्प उभारण्यात आलाय. 



दादार रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी दिसून येतेय. गेल्या दोन तासांपासून प्रवासी गाडीच्या प्रतिक्षेत उभे आहेत. यात डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याचंही दिसून येतंय.


दरम्यान, टिळक नगर - चेंबूर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरवर पुलाचा स्लॅब कोसळल्याची माहिती चुकीची असून रेल्वे मार्गावर डिव्हाडरचा मलबा असल्याचं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलंय. हा मलबा हटवण्याचं काम सुरू आहे.


दुसरीकडे, तांत्रिक कारणामुळे मुंबईतील मोनो रेलही बंद पडलीय. गेल्या तीन तासांपासून एकही मोनो रेल्वे धावलेली नाही. त्यामुळे मोनो रेल प्रशासनानं प्रवाशांची माफी मागत प्रवास न करू शकणाऱ्या प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत दिल्याचं म्हटलंय. 



 दुसरीकडे दरवेळी मुसळधार पावसात शीव प्रतिक्षा नगर इथल्या रहिवासी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानंतर शीव परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. महत्वाचे म्हणजे या पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही यंत्रणा इथे नाही. 



महापालिकेचं आवाहन 


दरम्यान, मुंबई आणि उपनगरात पावसाने आता विश्रांती घेतलीय. सकाळी झालेल्या पावसामुळे त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावलीय. सखल भागात पाणी साचल्याचंही पाहायला मिळालं. हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलाय. यामुळे मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय. आता समुद्रात ४.९० मीटरच्या लाटा उसळणार आहे. त्यामुळे समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन पालिकेनं केलंय. आपत्कालीन परिस्थितीत १९१६ क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही पालिकेनं केलंय.