देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास, मुंबई : मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आता स्वतःच्या मेहनतीवर आणि कामावर विश्वास राहिला नाही. रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार धावाव्यात यासाठी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चक्क 'नवग्रहांची शांती पूजा' घातली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या या कारनाम्यावर टीका होऊ लागलीय. रेल्वेचे अधिकारी आता बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या आहारी गेलेत. मध्य रेल्वेच्या कारभाराचा खेळखंडोबा थांबवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी सीएसएमटीवर चक्क नवग्रहांची शांती पूजा घातली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मे आणि जून महिन्यात नियोजनशून्य पद्धतीनं लोकल गाड्या चालवल्या आता यात नवग्रहांचा काय दोष... उन्हाळ्यात नालेसफाई केली नाही. मोठ्या पावसात रेल्वे रूळ पाण्याखाली गेले... सांगा यात नवग्रहांची काय भूमिका? पेन्टाग्राफ नादुरुस्त झाला, लोकल रखडली... सांगा यात नवग्रहांनी रेल्वेचं काय घोडं मारलं? या सगळ्या घटनांना कुठं ना कुठं मानवी चुका जबाबदार आहेत. त्या सुधारण्याऐवजी रेल्वे अधिकाऱ्यांनी चक्क नवग्रहांची पूजा घातली. ही पूजा घालणाऱ्या पुरोहितालाच 'झी २४ तास'नं गाठलं. - सुनील पांडे, पंडित


नवग्रहाच्या शांतीसाठी अशी पूजाच घातली नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनानं केलाय. 'अशी कुठल्याही पद्धतीची पूजा झाली नाही. देवाचा आशीर्वाद आहेच पण आम्ही मेहनतीवर विश्वास ठेवतो. कर्मचारी विविध पूजाचं आयोजन करतात त्यापैंकीच ही पूजा असेल' असं म्हणत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 



प्रवाशी संघटनांनी मात्र रेल्वेच्या या बुवाबाजीवर सडकून टीका केलीय. चुका झाल्या त्या सुधाराव्यात, प्रवाशांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधावा... जमलं तर गर्दीच्या लोकलमधून प्रवास करावा, असं प्रवाशांचं म्हणणं आहे. एसीत बसणाऱ्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हे करणं सोडून बुवाबाजी करायला सुरुवात केलीय. कामावर निष्ठा नसलेल्या अशा बुवाबाज अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची मागणी रेल्वे प्रवाशांमधून केली जातेय.