मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी विस्कळीत झाली. या मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी अप गाड्यांची वाहतूक सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू असल्याचे प्रवाशांचे हाल होत आहेत. कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने या मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. दरम्यान, दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने पूर्ण केले तरी वाहतूक उशिरानेच सुरू राहणार आहे. सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचा ताण जलद लोकलवर पडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोपर रेल्वे स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या धीम्या गतीच्या रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळे सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज सोमवारी सकाळच्या वेळात वाहतूक मंदावली. मुंबईच्या दिशेने अप धिम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गांवर गाड्यांची रांग लागल्याचे पाहायला मिळत होते. ऐन गर्दीच्या वेळी बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.


दरम्यान, कोपर रेल्वे स्टेशनजवळ रुळाची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास रुळाला तडा गेला होता. आता काम पूर्ण झाल्याने वाहतूक पूर्वपदावर आली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या प्रचंड गर्दी पाहायलाम मिळत आहे. काही प्रवासी तर मध्य रेल्वेच्या नावाने शिमगा करत आहेत.