ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?
Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे.
Central Railway Megablock: फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी मध्य रेल्वेने ठाणे आणि सीएसएमटी येथे मेगाब्लॉकचे आयोजन केले आहे. ठाणे येथे 63 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. या काळात 930 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. तर, 33 लाख प्रवाशांना हाल सोसावे लागणार आहेत. ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी ६३ तासांचा ब्लॉक असेल. गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत ठाण्याचा ब्लॉक सुरू असेल.
ठाणे स्थानकात फलाट क्रमांक 5 आणि 6 चे रुंदीकरण करण्यात येणार आहे. यामुळं स्थानकातील गर्दी विभागणार असून नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचा रेल्वेचा दावा आहे. फलाट क्रमांक पाचचे मॉड्युलर फलाटाच्या मदतीने रुंदीकरण करण्यात येणार आहे. ठाणे स्थानकात नेहमीच प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. त्यातच फलाट क्रमांक 5-6 येथे नेहमीच जास्त गर्दी असते. कारण फलाट क्रमांक पाचवरुन जलद लोकल आणि मेल एक्सप्रेसदेखील धावतात. त्यामुळं लोकल प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाट पाहणारे प्रवासी अशा दोघांची गर्दी फलाट क्रमांक 5वर असते. त्यामुळं सध्या 10 मीटर रुंद असलेल्या फलाट 13 मीटर रुंद करण्यात येणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-2 अंतर्गंत ठाणे-दिवा पाचवी सहावी मार्गिका उभारण्याच्या निधीतून फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. फलाटाची रुंदी वाढल्यानंतर प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा मिळणार आहे. तसंच, फलाट क्रमाक पाचला जोडून असलेल्या सहावर होणारी गर्दीदेखील नियंत्रणात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर मुंबईहून कर्ज, कसारा, बदलापूर, कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या जलद उपनगरीय रेल्वेगाड्या थांबतात. तर, सहावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद रेल्वेगाड्या थांबतात. अनेकदा या प्लॅटफॉर्मवर उभं राहणे खूप कठिण जाते. कधीकधी चेंगरा चेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं रेल्वे प्रशासनाने फलाटाची रुंदी वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी 63 तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.
ठाणे येथे मेगाब्लॉक
ठाणे येथील फलाटाच्या रुंदीकरणासाठी गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.
ब्लॉक १ –
ठाणे येथे ६३ तासांचा विशेष ब्लॉक
ब्लॉक कालावधी – गुरुवारी मध्यरात्रीच्या १२.३० ते रविवार दुपारपर्यंत
ब्लॉक २ –
सीएसएमटी येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक
ब्लॉकची कालावधी – शुक्रवार मध्यरात्रीच्या १२.३० ते रविवार दुपारी १२.३० पर्यंत
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद, धीमा मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल.