Weather Update: मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस नागरिकांना गारवा जाणवतोय. मात्र दुपारच्या वेळेस उष्णतेचाही सामना करावा लागतोय. मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये हवामानात सतत बदल होताना दिसतायत. उपनगरातील किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान 19 ते 21 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले आहे. कमाल तापमान अजूनही 31 ते 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यानच आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 17 आणि 18 डिसेंबर रोजी रात्रीचे तापमान 21 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत ते पुन्हा 19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचीही शक्यता आहे.


शनिवारी कमाल तापमान 32.8 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. येत्या आठवड्यातही कमाल तापमान 32 अंश ते 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असल्याची माहिती आहे. येत्या दोन दिवसांत आकाशात धुकं आणि काही ढग दाटून येतील. मात्र पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.


स्कायमेटचे मुख्य मेट्रोलॉजिस्ट महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 25 डिसेंबरपर्यंत कमाल तापमानात घट होण्याची शक्यता नाही. उत्तरेत जोरदार बर्फवृष्टी झाल्याशिवाय तापमानात फारशी घट होणार नाही.


देशात हवामान कसं राहिल?


दरम्यान पुढील पाच दिवसांत अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. शिवाय या पावसामुळे थंडी आणखी वाढणार आहे. 17 आणि 18 डिसेंबर 2023 रोजी आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये दाट धुक्याचा अंदाज आहे. सोमवारी केरळ आणि तामिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. 


आजच्या दिवशी या भागांत पावसाची शक्यता


जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तर पंजाबमध्ये 17 डिसेंबरला म्हणजेच आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. डोंगराळ राज्यांतील पावसाचा परिणाम मैदानी भागावरही होण्याचा अंदाज आहे. 17 आणि 18 डिसेंबर रोजी गुजरात किनार्‍याजवळ आणि 45 किमी प्रतितास वेगाने 25-35 किमी प्रतितास वेगाने समुद्रकिनारी वारे वाहण्याची शक्यता आहे.