मुंबई : आमदारांना निधीवाटपच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना-भाजपात जुंपण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदारांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांशी या मुद्यावर भेट घेऊन चर्चा करणार आहेत. मात्र या बैठकीला ते आपल्या पक्षाच्या आमदारांनाही सोबत नेणार आहेत. यापूर्वीही शिवसेना आमदारांनी पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार केली आहे.


याआधी ही पुढे आला होता रोष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तेत सहभागी असूनही कामं होत नाहीत. मतदारसंघात पुरेसा विकास निधी उपलब्ध होत नाही याबद्दल शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र रोष आहे. सेनेच्या मंत्र्यानी आमदारांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेण्यात धन्यता मानल्याची भावना शिवसेना आमदारांमध्ये निर्माण झाली होती. याप्रश्नी शिवसेना मंत्र्यानी अनेकदा मुख्यमंत्र्याची भेटही घेतली. मात्र समान निधी वाटपाच्या आश्वासनाशिवाय पदरात काहीही ठोस पडलेलं नाही. शिवसेना आमदारांच्या निधी वाटपाचे घोंगडं अजून तसंच भिजत आहे. त्यामुळे शिवसेना आमदार-मंत्र्याअंतर्गत निर्माण झालेली मतभेदांची दरी दिवसागणिक वाढतेय. ज्यामुळं मुख्यमंत्री निर्धास्त आहेत, तर शिवसेना पक्ष संघटनेच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंसाठी हा नक्कीच चिंतेचा विषय आहे.


पाहा बातमीचा व्हिडिओ



उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर तरी आमदारांच्या मागण्यांवर लक्ष दिलं जाणार का हे पाहावं लागणार आहे.