मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काल केलेल्या एका वक्तव्यावरुन राज्याच्या राजकाराणात नवी चर्चा सुरु झाली आहे. मला माजी मंत्री म्हणून नका, येत्या दोन-तीन दिवसात स्पष्ट होईल, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन आता चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात टोलवाटोलवी सुरु झाली आहे.


संजय राऊत यांनी उडवली खिल्ली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या  वक्तव्याची संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. चंद्रकात पाटील आणखी पंचवीस वर्ष तरी माजी मंत्री म्हणूनच राहणार आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करतंय, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. चंद्रकांत पाटील येत्या दोन दिवसात बोलले होते, त्यातले 24 तास संपले आहेत, आणखी 24 तास राहिले आहेत, वाट पहा, तीन  पैकी एक पक्षात प्रवेश करु असं चंद्रकांत पाटील यांना वाटत असावं, म्हणून ते माजी राहणार नाही, असं म्हटले असतील, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.


माझ्या कानावर असं आलं आहे की चंद्रकांत पाटील यांना नागालँडचे राज्यपाल म्हणून विचारणा करण्यात आली आहे. नागालँडचे राज्यपाल म्हणून ते जात असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला आहे.


चंद्रकांत पाटील यांच्याकडून  प्रत्युत्तर


संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनीही त्याच भाषेत उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार आहेत, असं मला कळतंय, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. तसंच संजय राऊत यांना कोणी फार गंभीरतेने घेत नाही, असा टोमणाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. 


मराठी माणूस काहीही होऊ शकतो


संजय राऊत यांनीही या वाक्याचा समाचार घेतला. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो, मराठी माणून काहीही होऊ शकतो, असं सांगत संजय राऊत यांनी महाराष्ट्राला माहित नसताना चंद्रकांत पाटील मंत्री होऊ शकतो तर राऊत आणि शिवसेना कोणत्याही पदावर पोहचू शकतात, असं राऊत यांनी म्हटंल आहे. तसंच ज्यांना कुणाला आमच्यासोबत यायचं त्यांनी खुशाल यावं आणि भावी व्हावं, असं आवाहनच संजय राऊत यांनी केलं आहे.