मुंबई : शिवसेनेला विश्वासात घेऊनच नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या रविवारी भाजपाची पुढची मेगाभरती होणार आहे. त्यावेळी नारायण राणेंचाही भाजपा प्रवेश होईल, अशी चिन्हं आहेत. येत्या आठ दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा स्वतः राणेंनी केली आहे. मात्र शिवसेनेचा त्याला विरोध आहे. त्यामुळं याबाबत आता मुख्यमंत्री काय तोडगा काढतात, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपनं झुलवत ठेवलं आहे. शिवसेनेकडे बोट दाखवत भाजप राणेंचा प्रवेश टाळत असल्याचं चित्र आहे. कोकणचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेल्या राणेंची सध्याची अवस्था त्यांच्या चाहत्या-कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी आहे. आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष गुंडाळून विनाशर्त पक्षांतरासाठी तयार असलेले राणे भाजप प्रवेशाची तारीख पे तारीख स्वतःच जाहीर करत असताना भाजप नेते मात्र त्यांना प्रतिसाद देताना दिसत नाही आहेत.


नारायण राणेंनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा गणेश चतुर्थीआधीच केली होती. पण एरवी प्रवेशाचा धडाका लावणाऱ्या भाजपानं राणेंना प्रवेशासाठी तंगवलं आहे. प्रवेशाची नवनवी तारीख जाहीर करून राणे हेडलाईन्समध्ये जागा मिळवत असले तरी, भाजपचे नेते त्यांचं स्वागत करण्याऐवजी शिवसेनेकडे बोट दाखवून मोकळे होतात.


एरवी प्रत्येक बाबतीत शिवसेनेला गृहित धरणारे भाजप नेते राणेंच्या प्रवेशावर शिवसेनेला इतकं महत्व देतील याबाबत शंका आहे. पण राणेंना असं झुलवत ठेवून त्यांची भाजपला फारशी गरज नाही असा संदेशच राणेंना द्यायचा असावा. दुसरीकडे भाजप प्रवेश झाला नाही तर राणेंचे समर्थक भाजप-शिवसेनेत जातील अशी राणेंनाही भीती आहे. त्यामुळे राणेंना आता कोणत्याही अटी-शर्ती न घालता भाजपमध्ये सामिल व्हावं लागेल.