धारावीत सरकारने नव्हे तर RSS च्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घातला - चंद्रकांत पाटील
ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत त्याचे कौतुक केलं पाहिजे
प्रताप नाईक, झी मीडिया, मुंबई : धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले आहेत.
ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत त्याचे कौतुक केलं पाहिजे. पण चुकीच्या गोष्टीवर टीका करायची नाही का? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी 'धारावी' कोरोनाचा केंद्रबिंदू ठरली. पण या धारावीने कोरोनावर मात केली आहे. पण याचं श्रेय सरकारचं नसून राष्ट्रीय स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेल्या स्क्रिनिंगचं आहे असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने १४ वित्त आयोगाचे ग्रामपंचायतीना दिलेले ते पैसे राज्य सरकार कसे वापरू शकते? असा सवालही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. हे पैसे राज्य सरकारने घेता कामा नये, ते परत ग्रामपंचायतींना मिळाले पाहिजे. तसेच वित्त आयोगाने मांडलेल्या प्रस्तावावर हसन मुश्रीफ यांनी सत्कार करून घेतला.
यात मुश्रीफ यांचे काहीही काम नाही,श्रेय घेऊ नये. केवळ कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या सगळ्यावर आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्या प्रमाणेच भाजप नेते नितेश राणे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. धारावीत कोरोनाचे रुग्ण कमी झाले याचं संपूर्ण श्रेय हे RSS च्या स्वयंसेवकांना असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.