चंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्षपद सोडणार? या दोन नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा
भाजपमध्ये संघटनात्मक बदलांचे वारे, प्रदेशाध्यक्षपदासाठी दोन नावांची चर्चा
Maharashtra Politics : महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर आता भाजपमध्ये (BJP) संघटनात्मक बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) भाजप प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची शक्यता असून ही जबाबादारी आता नव्या नेत्याच्या खांद्यावर देण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात?
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आता सर्वांचं लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे. नव्या सरकारमध्ये कोणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता लागली आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपमध्येही संघटनात्मक बदल केले जात आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नव्या नेत्याच्या खांद्यावर देण्याची शक्यता आहे. यासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) आणि राम शिंदे (Ram Shinde) यांच्या नावाची चर्चा आहे.
आशिष शेलार हे भाजपचे आक्रमक नेते आहेत, त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवत आशिष शेलार यांच्या आक्रमक भूमिकेचा पक्षाला फायदा होणार आहे. शेलार यांनी याआधी मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे, तसंच ते युती सरकारमध्ये मंत्री देखील होते.
तर राम शिंदे यांची नुकतीच विधान परिषदेवर निवड झाली आहे. अनुभव नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.