मुंबई : भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव मंजूर केल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय (CBI) चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.


अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, बेकायदेशीरपणे पैसे वसुली हाच सरकारचा कारभार आहे


- अजित पवार यांनी दर्शन घोडावत यांच्या मार्फत कोट्यावधीची वसुली केली असा सचिन वाझेनी आरोप केला आहे, सचिन वाझे हे अनिल परब यांच्यासाठीही वसुली करत होते


- महापालिकेतील अनेक कंत्राटदारांना वसुलीसाठी अनिल परब यांनी सचिन वाझेकडून धमकी दिली गेली. पन्नास कंत्राटदाराकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले


- सैफी बुर्हानी ट्रस्टची चौकशी करून त्यांच्या संचालकांकडून पन्नास कोटी वसूल करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना अनिल परब यांनी दिलं होतं


- अजित पवार, अनिल परब आणि दर्शन घोडावत यांचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी


- महाराष्ट्रातील जनतेचा कायद्यावरील विश्वास उडत चालला आहे, याची गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी


भाजप कार्यकारणीचा ठराव काय होता?


भाजप कार्यकारणीत मांडलेल्या ठरावात म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे सातत्याने उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे' असं ठरावात मांडण्यात आलं आहे. तसंच गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी” अशी मागणी कार्यकारिणीने केली आहे


'तर आमच्याकडे महाविकास आघाडीचं सरकार'


दरम्यान, महाराष्ट्रात बंगाल मॉडेल राबवायचं असेल तर भाजपच्या डावपेचाला महाविकास आघाडी घाबरत नाही, भाजपकडे केंद्राची सत्ता असेल तर राज्याकडे पण महाविकास आघाडी सरकार आहे, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. भाजपचे वरिष्ठ नेते अडचणीत येणार आहेत, त्यामुळेच त्यांची ही धडपड सुरु असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 


एकूणच येत्या काळात भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये संघर्ष आणखी तीव्र होणार हे निश्चित आहे.