मुंबई : दिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत आहे. काँग्रेसने शरणागती पत्करली आणि काँग्रेसची संपूर्ण व्होट बँक 'आप'कडे गेली आहे. सगळ्यांनी एकत्र यायचे पण भाजपला येऊ द्यायचं नाही, असे धोरण असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पण आम्ही देखील घाबरत नसल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्लीच्या निकालावरुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपच्या जागा वाढल्यात. आजच्या पराभवात उद्याचा विजय दडलेला असतो, अशी प्रतिक्रीया दिलीये. आमच्यात तीन जागांपेक्षा एक जरी जागा जास्त आली असता तर आम्ही विजयी झालो असतो. अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.


काँग्रेसच्या ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपला देशभर एकटे पाडण्यासाठी वाटेल ती तडजोड करून सर्व एकत्र येत आहेत. महाराष्ट्र हे त्याचे मोठे उदाहरण आहे. ज्या दिल्लीत पंधरा वर्षे काँग्रेसने राज्य केले, त्याच काँग्रेसला चार टक्के मते पडत आहेत. ही जी कग्रेसची मते दुसरीकडे वळली आहेत. त्यामध्ये आमचा पराभव म्हणता येणार नाही. आमची कामगिरी चांगली झाली आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत.


 देशभरातील सर्वच राजकीय पक्षांना आमचे आव्हान कायम आहे. त्यांनी आमच्याविरोधात स्वतंत्र लढावे. सर्व एकत्र येऊन ताकद उभी करणे आणि सामायिक कार्यक्रमावर काम करणे यामध्ये काही मजा नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.


दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करत भाजपने ‘आप’ला आव्हान दिले. मात्र, ‘आप’ने विकासाचा मुद्दा प्रचारात ठेवून आपली भूमिका कायम ठेवली. त्याचे परिणाम निकालात दिसून आले. दिल्लीच्या मतदारांनी विकासाला प्राधान्य ‘आप’ला भरभरुन यश दिले.  ‘आप’ने भाजपला जोरदार दणका दिला. काँग्रेसला  भोपळाही फोडता आला नाही.  ७० जागांपैकी ६३ जागा ‘आप’ने जिंकल्या, तर भाजपने सात जागांवर विजय मिळवला.