मुंबई : मेगाभरती ही चूक होती. त्यामुळे भाजपच्या संस्कृतीला धक्का बसला, असे वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड येथे केले होते. या वक्तव्यावर विरोधकांकडून हल्लाबोल चढविण्यात आला. आज दुसऱ्या दिवशी चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विधानावर यू टर्न घेतला. इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांचा आम्हाला अभिमानच आहे. त्यांना प्रवेश देऊन पक्षाला कुठलाही पश्चात्ताप झालेला नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे. 


'त्यांना' काढून चूक सुधारा - राष्ट्रवादी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


आकुर्डी इथे संघटनात्मक कार्यक्रमसाठी मी गेलो होतो, तिथे मी जे बोललो त्याचा खूप विपर्यास माध्यमांनी बातम्यांमधून चालवला आहे. जे जे आमच्या पक्षात त्याला आम्हाला अभिमान आहे, यामुळे आमच्या पक्षाला मोठा फायदा झाला आहे, पक्ष वाढण्यास मदत झाली आहे. २०१४  आणि २०१९ काळांत जे पक्षात आले, आता सत्ता नसतांना आजही ही लोकं पक्षात आहेत. या लोकांचे पक्ष प्रवेशाचे निर्णय हे एकमताने कोर कमिटीमध्ये घेतले आहेत.  आम्ही कोर कमिटीमध्ये निर्णय घेतो. बाकीच्या पक्षांत एक व्यक्ती निर्णय घेतो, शरद पवार एकटे निर्णय घेतात, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीला हाणला.


 मेगाभरती ही चूक होती. त्यामुळे पक्षातील संस्कृती बिघडली, असे त्यांनी म्हटले होते.  आपल्या पक्षात नेत्यांच्या जवळच्यांना पदे देण्याची पद्धत सुरू झाली आहे. हा माझा, तो माझा, तुझे काम करून देतो. तिकडे जातो का? मग त्याच्याकडूनच तिकीट घे. तुला कसं तिकीट मिळत नाही पाहतोच. ही जी संस्कृती रुजलीय तिला सुरुंग लावण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले होते. हा रोख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने होता, अशी चर्चा होऊ लागली. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद या निमित्ताने पुढे येतो काय, अशी चर्चा सुरु असताना चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावर यू टर्न घेतला आहे.


भाजपची मेगाभरती ही चूक असल्याचे वक्तव्य प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपला टोला लगावला आहे. तर शिवसेनेकडूनही हल्लाबोल करण्यात आलाय. शिवसेनेने म्हटले आहे, हे उशिरा सुचलेले शाहणपण आहे. तर राष्ट्रवादीने ज्यांना पक्षात स्थान दिले आहे. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा आणि आपली चूक सुधारा, असा सल्ला दिला आहे. तुमची चूक झाली असेल तर ती सुधारा आणि जे आमदार, खासदार झाले आहेत आणि नेते आयात केले त्याना पक्षातून काढून चूक सुधारण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.