Chandrayaan 3 Landing : भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे चंद्रयानाचे (Chandrayaan) यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी समस्त भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले. भारताच्या चांद्रयानाचं विक्रम हे लँडर (Vikram Lander) यशस्वीरित्या उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त केल्या. इस्त्रोच्या कमांड सेंटरमधून सुरु असलेले प्रक्षेपण वर्षा निवासस्थानी  मुख्यमंत्र्यांनी पाहिले. मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सर्वानीच आनंदाने टाळ्या वाजवून ही मोहीम फत्ते झाल्याबद्धल आनंद साजरा केला. तसेच उपस्थितांना पेढेही वाटण्यात आले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.  या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरीकोटा येथून 14 जुलैला 'चांद्रयान3' हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले.  'चांद्रयान 3' कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते असे सांगून मुख्यमंत्रांनी भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे असं म्हटंल आहे. 


रशियाचे 'लुना-25' यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळले होते.  त्या पार्श्वभूमीवर आज 'चांद्रयान 3' चे यश हे संपूर्ण जगात उजळून निघाले आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 


शरद पवार यांनी केलं शास्त्रज्ञांचं अभिनंदन
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चांद्रयान3 मोहिम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं आहे. जवाहरलाल नेहरू यांनी या देशातल्या विज्ञानावर लक्ष केंद्रित केलं वैज्ञानिकांना प्रोत्साहित केलं त्याच आज चीज झालं असं शरद पवार यांनी म्हटलंय. तसंच मला नेहरू सेंटरने चांद्रयान 3 च यशस्वी लँडिंग पाहण्याची संधी दिली, भारतातल्या सर्व वैज्ञानिकांचा मी अभिनंदन करतो आभार मानत, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात कायम आपण अपडेट असलं पाहिजेत हे इस्रोने दाखवुन दिलं अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. 


माझ्या मते या यशामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे महत्व नसून देशातील वैज्ञानिक आणि मेहनत करणाऱ्या लोकांचे कष्ट आहेत त्याच हे यश आहे. यामध्ये राजकारण न आणता आपण पाहिलं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.