निर्दोष मुक्ततेनंतर भुजबळ म्हणतात, ``तुमचा छगन भुजबळ करु म्हणणाऱ्यांनो तुम्हालाही``
निर्दोष मुक्ततेनंतर छगन भुजबळ यांनी शेरोशायरी करताना म्हटलंय, साज़िशें लाखो बनती हें मेरी `हस्ती` मिटाने की... बस `दुआयें` आप लोगों
मुंबई : महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह ८ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यात पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांचाही समावेश आहे. मुंबईच्या एसीबी विशेष सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. निकाल आल्यानंतर छगन भुजबळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावर बोलताना छगन भुजबळ, "महाराष्ट्र सदन प्रकरणात आमच्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आले.
छगन भुजबळ यांची शेरेबाजी
निर्दोष मुक्ततेनंतर छगन भुजबळ यांनी शेरोशायरी करताना म्हटलंय, साज़िशें लाखो बनती हें मेरी 'हस्ती' मिटाने की... बस 'दुआयें' आप लोगों (जनता) की उन्हें 'मुकम्मल' नही होने देती, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही या संकटांना तोंड दिलं, आमच्या मनात कुणाबद्दलही तक्रार नाही."
तर तुमचा भुजबळ करु
तुमचा भुजबळ करु, भुजबळ करु म्हणणाऱ्यांनाही त्रास होणार, मला न्यायदेवतेने निर्दोष सोडलं पण त्यांनाही त्रास होणार आहे. असा टोला छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.
ईडीची केस आणि ८०० कोटींचा आरोप
महाराष्ट्र सदन प्रकरणात कंत्राटदाराला एक रुपया देखील मिळाला नाही, एक फूट देखील जमीनीचा एफएसआय मिळाला नाही, तसेच ईडीची केस आता यावरच आहे की, महाराष्ट्र सदनातून ८०० कोटी रुपये उभे केले.
लोक मला झोपू देणार नाहीत
निकालानंतर आज निश्चितच समाधानाने झोप लागेल पण आज काही लोक मला झोपू देणार नाहीत, पण शांतपणे झोपत आलो आहे, आणि झोपणार आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. मी सव्वा दोन वर्ष तुरुंगात राहिलो, मला आतड्यांचा त्रास झाला. केईएमच्या डॉक्टरांना धन्यवाद दिले पाहिजेत, कारण त्या पॅनक्रियाच्या त्रासातून मी बचावलो.
शरद पवारांनी कठीण काळात साथ दिली म्हणून...
माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, लोकांनीही माझ्यावर विश्वास दाखवला, निर्दोष मुक्तता झाल्यानंतर शरद पवार यांना भेटलो, कारण ज्या कठीण काळात पवारांनी मला साथ दिली त्यांना भेटणं आवश्यक होतं, आणि शरद पवार वर्षावर असल्याचं कळलं तेव्हा, वर्षावर मुख्यमंत्र्यांना आणि शरद पवार यांनाही भेटलो सर्वांनी निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल अभिनंदन केल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे, फटाके आणि गुलाल उधळत आनंद साजरा केला आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया हे या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
उच्च न्यायालयात आव्हान देणार
अंजली दमानिया उच्च न्यायालयात जाणार आहेत, निकालाला आव्हान देणार आहेत, यावर छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे, कुणाला उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल तर जावू शकतात, संविधानाने सर्वांना अधिकार दिला आहे.