मुंबई : 'नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतोय', काय परिस्थिती आहे तुमच्याकडे? मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षातून मुंबई महापालिका आणि पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षाला स्वत: हॉटलाईनकरून मुख्यमंत्र्यांनी अशी विचारणा केली. मुंबई शहर आणि परिसरात तसेच राज्यात अन्य भागात सुरू असलेल्या पावसाची आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती करून घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुपारी साडे तीनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावरील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली. मुंबई शहरात कुठल्या ठिकाणी पाणी तुंबले आहे, झाडे पडली आहेत. कोणी जखमी झाले का वाहतुकीची तसेच दळणवळणाच्या स्थितीची काय परिस्थिती आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वत: हॉटलाईनवरून संपर्क साधला.


मुंबई शहरात 25 ठिकाणी पाणी तुंबल्याच्या तक्रारींची नोंद झाली असून मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडे झाडे पडल्याच्या तक्रारींची संख्या वाढली आहे. मात्र सुदैवाने त्यामुळे कुणीही जखमी झाल्याची घटना घडलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी परिस्थीतीचा आढावा घेतल्यानंतर सांगितले.


जोरदार पावसामुळे दळणवळणाच्या साधनांवर परिणाम झाला आहे. मुंबईतील लोकल सेवा तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तुंबलेले पाणी उपसा करण्यासाठी मोठ्या क्षमतेचे पंप लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिस्थिती लोकसेवा पूर्वपदावर येण्यास मदत होईल.


मुंबईतील शासकीय कार्यालयील कर्मचाऱ्यांना दुपारी अडीचनंतर घरी सोडण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संस्था आणि विभागाच्या मी संपर्कात आहे. मुंबईत बसविलेल्या सीसीटिव्ही प्रणालीमुळे एकाच ठिकाणी बसून शहरातील वाहतुकीवर लक्ष ठेवले जात आहे. हवामान खात्याच्या पुढील 24 तासांसाठी असलेल्या अंदाजाची माहिती घेऊन ती वेळोवेळी नागरीकापर्यंत पोहोचविली जाईल. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनदेखील मुख्यमंत्र्यांनी केले आहे.