मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या सकाळी होणार शस्त्रक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि पाठदुखीचा त्रास
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्यावर उद्या सकाळी एच एन रिलायन्स (H N Reliance Hospital) रूग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. पाठीचं आणि मानेचं दुःखण डोकं वर काढल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. उद्या सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. तपासण्यांनंतर शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली मात्र पुन्हा एकदा मान आणि पाठ दुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला.
त्याआधी काल मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. त्यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं आहे. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच !
पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.