गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : पैशांची गरज असलेल्या गरीब कुटुंबियांना पकडून त्यांचे मूल दत्तक घेतो सांगत ते परस्पर जास्त पैशात विकणाऱ्या एका टोळीला अंधेरी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये मुल विकत घेणाऱ्या दोघा व्यक्तींसोबत चार महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुनंदा बिका मसाले, सविता मंगेश साळुंखे, भाग्यश्री कदम, आशा उर्फ ललिता जोसेफ अशा महीला टोळीतील आरोपींची नावे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा हा हट्ट आज २१ व्या शतकातही पाहायला मिळतोय. या हट्टापायी बेकायदेशीरपणे मुलं विकणाऱ्या टोळीकडून मुलं विकत घेणं किती महागात पडतं त्याचा प्रत्यय देणारी ही घटना आहे. गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांचं हे काम सुरू होतं. मात्र पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली आहे. ही टोळी सध्या पोलीस कोठडीत आहे. चारही महिला आरोपी या रुग्णालयात काम करत आपलं सावज हेरत असतं. आरोपी महिलांबरोबरच दोन मुलं विकत घेणाऱ्या दोन वेगवेगळ्या पालकांनासुद्धा अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर देखील मुले तस्करीचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांनी अजून कोणत्या मुलांना अशाप्रकारे विकल आहे का याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.



हॉस्पिटलशी संबंधित असणाऱ्या आणि अनेक ठिकाणी काम करणाऱ्या चार महिला आरोपींनी एक टोळी बनवली होती. या टोळीच्या माध्यमातून पैशांची गरज असलेल्या पालकांना शोधून त्यांचे मूलं इतरांना दत्तक पद्धतीने देण्याचा घाट घातला जायचा. दर महिन्याला मुलांची सुरक्षितता पाहता येईल असे देखील ही टोळी सांगायची. मात्र या कारस्थानाची भांडाफोड अखेर अंधेरी गुन्हे शाखेने केली आहे. तीन वर्षांपूर्वी दत्तक पद्धतीने मुलं विकलेल्या पालकांना आपल्या मुलाला एकदाही न पाहता आल्याने त्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी अगदी शिताफीने तपास करत या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.