CIDCO Lottery 2025 : हक्काचं घर प्रत्येकालाच हवंहवंसं वाटतं. हे घर तयार करताना अनेक मंडळी प्रचंड मेहनत घेतात, दिवसरात्र एक करून संघर्ष करतात. सरतेशेवटी घराचं स्वप्न साकार होण्याचा क्षण या अशा इच्छुकांना मोठा दिलासा देऊन जातं. सिडको, (MHADA) म्हाडासारख्या संस्था हक्काच्या घरासाठी प्रयत्न करणाऱ्यांना मदत करतात. अशा या सिडकोच्या घरांसाठी आता सदर प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 


सिडको लॉटरीसाठीच्या अटींमध्ये बदल? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 ऑक्टोबरला सिडको महामंडळाने जाहीर केलेल्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या तब्बल 26 हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेला सध्या इच्छुकांनी कमालीचा प्रतिसाद मिळत दिला आहे. योजनेदरम्यान अनेक अटीशर्थींची पूर्तता करत प्रक्रियेचा पुढील टप्पा गाठला जातो. आता मात्र याच प्रक्रियेतील काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. 


हेसुद्धा वाचा : गर्दीत जायची भीती वाटते? हा आहे एक प्रकारचा आजार


उपलब्ध माहितीनुसार सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी नव्यानं अर्ज करणाऱ्यांना इथून पुढं बारकोड असलेलं प्रमाणपत्र सादर करण्यासोबतच स्टॅम्प पेपरवरची अट सिडकोनं शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोच्या घरासाठी नव्यानं अर्ज भरणाऱ्यांना कोऱ्या कागदावर स्वसाक्षांकित शपथपत्र (Self Atested ) सादर करता येणार आहे. ही योजना सुरू झाल्या क्षणापासून कैक दिवस उलटल्यानंतर आता सिडकोनं अटींसंदर्भातील ही नवी अपडेट जारी केली. इथं बारकोड नसलेलं रहिवास प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात येत असली तरी वाटपपत्र देण्यापूर्वी बारकोड असलेलं रहिवास प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं ठरणार आहे, तरच हा अर्ज पुढे पात्र धरला जाईल. 


काय आहे ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजना? 


सिडकोनं, दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ ही योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत सिडकोच्या वतीनं खारघर, वाशी, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, बामनडोंगरी, खारकोपर, कळंबोली अशा विविध नोडमध्ये घरं उपलब्ध करून देण्यात आली. योजनेतील सर्वाधिक, 13 हजार घरं तळोजा इथं उपलब्ध करून देण्यात आली होती. 


सदर योजनेअंतर्गत अर्जदारांना 11 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटामधील नागरिकांसाठी ही घरं उपलह्ध असून, यामध्ये योजनेच्या नावाप्रमाणेच अर्जदारांना त्यांच्या पसंतीचे घर निवडण्याचं स्वातंत्र्य असणार आहे. राहिला प्रश्न आवश्यक कागदपत्रांचा, तर अर्जदारांना ऑनलाइन अर्ज करताना ओळखपत्राच्या पुराव्यांसमवेत उत्पन्नाचं प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र अशा पुराव्यांचीही पूर्तता करावी लागणार आहे.