कल्याणमध्ये युवासेना-अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
या कार्यक्रमाला राजकीय स्वरुप देऊ नये, अशी मागणी आम्ही सुरुवातीपासून करत होतो.
ठाणे: मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभविप) आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. या कार्यक्रमाला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना बोलावण्यात आल्यामुळे अभविपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. या कार्यक्रमाला राजकीय स्वरुप देऊ नये, अशी मागणी आम्ही सुरुवातीपासून करत होतो. आदित्य ठाकरे यांच्याकडे कोणतेही संवैधानिक पद नसताना त्यांना या कार्यक्रमाला का बोलावण्यात आले, असा सवाल यावेळी अभाविपचे कार्यकर्ते प्रांजल मिश्रा यांनी उपस्थित केला.
याच मुद्द्यावरून कुलगुरुंचे भाषण सुरु असताना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. याचे पर्यवसन तुफान हाणामारीत झाले. आदित्य ठाकरे कार्यक्रमस्थळी उपस्थित असतानाच हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. आता यानंतर शिवसेना 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यासह भाजपचे काही नेते उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी या नेत्यांना कार्यक्रमाला येणे टाळले. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये अजूनही सर्व आलबेल नसल्याची शंका काहींनी बोलून दाखविली.