पुणे : राज्यात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर संजय राठोड यांना वन मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनाम्यानंतर काही काळ संजय राठोड राजकीय वर्तुळातून बाहेर होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी पुण्यातील वानवडी पोलिसांना जबाब दिला असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आमच्यावर कुणाचाही दबाव नाहीये आणि आमचा कोणावरही आरोप नाही. त्यासोबतच पोलिसांच्या तपासानंतर संजय राठोड यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


पण, याच दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संजय राठोड प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. शिवसेना आमदार संजय राठोड प्रकरणी पोलिसांचा अहवाल प्राप्त झालेला नाही, त्यामुळे क्लीन चीट देण्याचा प्रश्नच नाही, पुणे पोलीस तपास करत असून पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 


राठोड यांचे मंत्रिमंडळात कमबॅक?


माजी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळात समावेशाचे संकेत दिले होते. संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. सरकारमध्ये अशा धडाडीच्या लोकांची गरज आहे. त्यामुळे राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार, असं सूचक विधान शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केलं होतं.