राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात घट, हलक्या सरींचीही शक्यता
दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हलक्या सरींचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतमालाची काळजी घेण्याची गरज आहे.
मुंबई : दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हलक्या सरींचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतमालाची काळजी घेण्याची गरज आहे.
कमी दाबाच्या पट्टयामुळे ढगाळ वातावरण
दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे आज आणि उद्या राज्यातील कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आणि तापमानात घट होणार आहे. या दोन दिवसात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
गारपीट अथवा वादळाची शक्यता नाही
या काळात गारपीट अथवा वादळाची शक्यता नाही. मात्र शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे. या काळात बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींमुळे गहू आणि आंबा मोहोर यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
किनारपट्टीवर कमीदाबाचा पट्टा
किनारपट्टीवर कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रात न जाण्याचा इशारा सिंधुदुर्ग जल्हा प्रशासनाकडून मच्छीमारांना देण्यात आलाय. काल रिमझिम पाऊस झाल्यानंतर आजही पाऊस पडेल अशी स्थिती आहे .वादळी वारेही पाहायला मिळत आहेत.
पुढील ३ ते ४ दिवस ढगाळ वातावरण
ढगाळ वातावरणाचा परिणाम पुढले ३ ते ४ दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे पिकांवर विषेशतः कोकणात आंब्यावर तुडतुड्या आणि बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी, शेतक-यांनी कृषी विद्यापीठानं सूचना केल्यानुसार औषधांची फवारणी करण्याचं आवाहन रायगड जिल्हा कृषी अधिका-यांनी केलं आहे.