मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला ३० तासात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी महाराष्ट्रात पुन्हा एकदा रंजक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. शनिवारी अनपेक्षितपणे भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन खुलासा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोणतेच सरकार स्थापन होऊ शकत नसल्याने अजित पवार यांनी आम्हाला सहकार्य करण्याचे ठरवले. यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी राष्ट्रवादीच्या विधिमंडळाचे गटनेते म्हणून आमदारांच्या पाठिंब्यांचे पत्र आम्हाला दिले. त्याआधारे आम्ही सरकार स्थापन केले. मात्र, आज न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आज अजित पवार मला भेटायला आले. यावेळी त्यांनी मी काही वैयक्तिक कारणामुळे युतीत राहू शकत नाही, असे सांगत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. अजित पवार यांनी आमची साथ सोडल्याने आमच्याकडेही बहुमत उरलेले नाही. त्यामुळे मीदेखील राज्यपालांकडे जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 


अजित पवार राजकीय संन्यास घेणार ?


भाजपने पहिल्यापासूनच घोडेबाजार करणार नाही, ही भूमिका घेतली होती. त्यामुळे आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नाही. त्यामुळे आता महाविकासआघाडीला मी सरकार चालवण्यासाठी शुभेच्छा देतो. मात्र, महाविकासआघाडीतील पक्षांमध्ये इतकी मतभिन्नता आहे की, हे सरकार स्वत:च्याच ओझ्याखाली दबेल, अशी भीती मला वाटत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 


सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपदाचा विक्रम फडणवीसांच्या नावावर