पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
राज्यातील ३२५ तालुक्यांमधील ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील पीकं बाधित
मुंबई : अवकाळी पावसानं राज्यातील शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील नुकसानीची माहिती घेतली. राज्यातील ३२५ तालुक्यांमधील ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील पीकं बाधित झाली असून, त्यामध्ये ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकं यांचा समावेश आहे.
नुकसान झालेल्या भागांचं तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्थानिक गावकर्यांनी नुकसानीचे काढलेले छायाचित्र सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचं अवलोकन करावं, असं सांगतानाच यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार राज्यात पुढीलप्रमाणे नुकसान झाल्याची माहिती मिळत -
कोकण ४६ तालुके, ९७ हजार हेक्टर,
नाशिक ५२ तालुके, १६ लाख हेक्टर,
पुणे ५१ तालुके, १.३६ लाख हेक्टरहून अधिक,
औरंगाबाद ७२ तालुके, २२ लाख हेक्टर,
अमरावती ५६ तालुके, १२ लाख हेक्टर,
नागपूर ४८ तालुके, ४० हजार हेक्टर