राम कदमांबाबत विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी जोडले हात
भाजपने राम कदम यांच्या प्रवक्ते पदावरही निर्बंध घातले आहेत.
मुंबई: महिलांबाबत केलेले आक्षेपार्ह विधान आणि त्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबद्दल केलेल्या चुकीच्या ट्विटमुळे भाजप आमदार राम कदम यांची पुरती कोंडी झाली आहे. या परिस्थितीमुळे कालपर्यंत पाठराखण करणाऱ्या स्वपक्षीयांनीही राम कदम यांच्यापासून दूर राहायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांसमोर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे भाजप नेत्यांमध्ये योग्य तो संदेश गेला आहे.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीस यांना राम कदम यांच्या वक्तव्याबाबत विचारणा केली. त्यावेळी मुख्यमंत्री काही न बोलता केवळ हात जोडून पुढे निघून गेले. त्यामुळे आगामी काळात भाजप नेते राम कदम यांच्यापासून दूरच राहणे पसंत करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
तत्पूर्वी गुरुवारीच भाजपकडून राम कदम यांना प्रवक्ते म्हणून कोणत्याही वृत्तवाहिनीवरील चर्चेत सहभागी न होण्याचे तोंडी आदेश देण्यात आले होते. मात्र, पक्षाकडून त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. पोलिसांनीही शुक्रवारी कदम यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र, ही कारवाई पुरेशी नसल्याचे सांगत विरोधक आक्रमक झाले आहेत.