Shinde Slams Uddhav Thackeray: `घरात बसलेले` असा उल्लेख करत CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, `मी सर्वांना...`
CM Shinde Slams Uddhav Thackeray: पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लगावला टोला. मुख्यमंत्री शिंदे 8 आणि 9 एप्रिल रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत.
CM Shinde Slams Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदेंनी उद्धव यांचा थेट उल्लेख न करता आपण अनेकांना कामाला लावलं आहे असं म्हटलं. इतक्यावरच शिंदे थांबले नाही तर त्यांनी जे घरात बसायचे असा उल्लेख करतही उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंड दाखवण्यासाठी ठाणे स्थानकामध्ये दाखल झाले होते.
दाखवला हिरवा झेंडा
मुख्यमंत्री शिंदे उद्यापासून म्हणजेच 8 एप्रिलपासून अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. शिंदे हे 8 आणि 9 एप्रिल असे 2 दिवस अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिंदे दौऱ्यावर जाण्यापूर्वी शिवसेनेचे कार्यकर्ते आज अयोध्येला ट्रेनने रवाना झाला. या ट्रेनला मुख्यमंत्री शिंदेंनी ठाणे रेल्वे स्थानकामध्ये हिरवा झेंडा दाखवला. शिवसैनिकांना त्यांनी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
उद्धव ठाकरेंना टोला
यावेळेस विरोधकांनी तुमच्या या अयोध्या दौऱ्याची धास्ती घेतली आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री शिंदेंना विचारला. त्यावेळेस त्यांनी, "माझ्या दौऱ्याची धास्ती घेतली की नाही याबद्दल मी बोलणार नाही. पण मी सर्वांना कामाला लावलेलं आहे. सगळे जे घरात बसायचे ते रस्त्यावर येऊ लागलेत. फिरु लागलेत ही चांगली बाब आहे," असा टोला शिंदेंनी प्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंचं नाव न घेता लगावला.
सत्तासंघर्षावरही केलं भाष्य
सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आला असून एप्रिलच्या मध्यापर्यंत या प्रकरणाचा निकाल लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याच प्रकरणावरुन मुख्यमंत्री शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना शिंदेंनी, "हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा पक्ष शिवसेना आणि धुनष्यबाण लोकशाहीमध्ये मेरीटवर आम्हाला निवडणुक आयोगाने दिलेलं आहे. लोकशाहीमध्ये बहुमताचा महत्त्व असतं, इतकं मी आता सांगू शकतो," असं उत्तर दिलं.
श्रीकांत शिंदे ट्रेनने अयोध्येला रवाना
मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसेना कार्यकर्त्यांबरोबर रेल्वेने आज ठाण्यामधून अयोध्येला रवाना झाले आहेत. अयोध्येमध्ये मुख्यमंत्री शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान एकमेकांच्या राज्यांमध्ये महाराष्ट्र भवन आणि उत्तर प्रदेश भवन उभारण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या माध्यमातून या दौऱ्यामध्ये शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचं समजतं.