दीपक भातुसे, मुंबई :   कोरोना व्हायरसमुळे मुंबईत गंभीर होत असलेली परिस्थिती, सायन हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांजवळ मृतदेह ठेवल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ, संकट वाढत असताना नागरिकांमध्ये नसलेलं गांभीर्य आणि विरोधी पक्षनेत्यांनी नेतृत्वावरच उपस्थित केलेलं प्रश्नचिन्ह, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कठोर पावलं उचलत काही बदल करून यंत्रणेला इशारा दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेत मोठे फेरबदल करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला मोठा इशारा दिला. महापालिका आयुक्त म्हणून प्रवीण परदेशी कोरोना स्थिती रोखण्यात अपयशी ठरल्याचं चित्र निर्माण झालं. संपूर्ण मुंबईत एकच उपाययोजना, प्रोटोकॉल राबवण्यात अपयश, यंत्रणेत समन्वय साधण्यात अपयश, परस्परविरोधी आदेश काढून पुन्हा मागे घेण्याचे प्रकार, फिल्डवर न जाता मुख्यमंत्री फेलोशिपमधील मुलांना घेऊन आदेशाचा भडीमार, खालच्या अधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने वाढलेला गोंधळ असे अनेक आक्षेप परदेशींबाबत घेतले गेल्याचे कळते.


प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार न करता केवळ कागदी आदेशांचे घोडे नाचवल्याचा आक्षेपही परदेशींबाबत घेतला जातो. मुख्य सचिव अजोय मेहता आणि महापालिका आयुक्त म्हणून प्रवीण परदेशी यांच्यामध्ये शितयुद्ध असल्याची चर्चाही सुरु होती. त्यातच सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणेत समन्वय नसल्याची टीका केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रवीण परदेशी यांच्यासह मुंबई महापालिकेतील आणखी दोन अतिरिक्त आयुक्तांची बदली करून संपूर्ण प्रशासनालाच इशारा दिल्याचं मानलं जातं.


अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकारी परस्पर निर्णय घेतात. मंत्र्यांना विश्वासात घेतलं जात नाही, अशी तक्रारही मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी केली होती. त्यामुळे मुंबई महापालिका आणि मदत व पुनर्वसन खात्यातील अधिकाऱ्यांमध्ये बदल करून यापुढे कठोर होण्याचे संकेत प्रशासनाला दिले आहेत.


सायन हॉस्पिटलमधील गलथान कारभाराची दखलही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. तूर्तास कारवाई करण्याचे त्यांनी टाळले असले तरी कारवाईची वेळ आणू नका, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.


कोरोनाचे संकट वाढत असताना मुंबईत नागरिकांमध्ये बेशिस्त असल्याचं चित्र वारंवार दिसतं. जोपर्यंत नागरिक शिस्त पाळत नाहीत, तोपर्यंत कोरोना रोखता येणार नाही आणि लॉकडाऊनही संपणार नाही, असं स्पष्ट करून यापुढे केंद्रीय पथकं तैनात करण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये दिले आहेत. पोलिसांवर अविश्वास न दाखवता त्यांना विश्रांती देण्यासाठी केंद्रीय बल तैनात करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे यापुढच्या काळात मुंबईत केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या तैनात करून कठोर बंदोबस्त केला जाईल, असा इशारा नागरिकांनाही दिला आहे.


 



सुरुवातीच्या काळात कौतुक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांत विरोधकांच्या टीकेलाही सामोरं जावं लागत आहे. त्यातच कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही कठोर पावलं उचलल्याचं चित्र शुक्रवारी दिसलं.