मुंबई : महाराष्ट्राच्या भारूड लोककला प्रकाराला आपल्या सादरीकरणाच्या जोरावर सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या सच्चा लोककलावंतास आपण मुकलो आहोत, अशी श्रध्दांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ भारूडकार निरंजन भाकरे यांना निधनाबद्दल अर्पण केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारूड या लोककलेला बुरगुंडाकार निरंजन भाकरे यांनी आपल्या सादरीकरणाच्या आगळेपणातून सातासमुद्रापार पोहोचवले, त्याचे गारूडच रसिक प्रेक्षकांवर घातले. त्यांच्या बुरगुंडाने समाजातील अनेक घडामोडींवर मार्मिक असे भाष्य केले. भारूडातून समाजप्रबोधन करताना त्यांची तिरकस, बोचरी शैली विशेष ठरली. लोककला क्षेत्र आणि लोककलावंत यांबाबतही त्यांनी परखड भूमिका ठेवली.


भारूडाचे गारूड सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या महाराष्ट्राचे थोर लोककलावंत निरंजन भाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. (लोककलेचा वारसा जपणारा 'बुरगुंडा' हरवला, निरंजन भाकरे यांचे निधन) 


निरंजन भाकरे यांना कलेचा वारसा हा कुटुंबातूनच मिळाला. त्यांचे वडील जुने नाटकर्मी होते. त्यांनी आतापर्यंत अनेक नाटकात काम केलं आहे. निरंजन भाकरे लहानपणी ग्रामीण भागात नाटकात भूमिका करत. तसेच कलापथकात हार्मोनियम देखील ते वाजवत. अशोक परांजपे यांची मुलाखत वाचून निरंजन भारावले आणि त्यांच्या भेटीनंतर तर त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलला असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. भारूडाने मला गारूड घातले ते आयुष्यभरासाठीच, असं ते म्हणतं. 


निरंजन भाकरे यांनी भारूड सातासमुद्रापार पोहोचवले. अमेरिका, मलेशिया, थायलंडमध्ये त्यांचे कार्यक्रम देखील झाले आहेत. तसेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही त्यांची नोंद झाली आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या पत्नीचा आणि मुलाचा मोठा वाटा असल्याचं ते अनेकदा सांगत.  आज त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.