मुंबई : कोरोना संकटाच्या काळात अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा रखडल्या आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी  केवळ पदवीच्या विद्यार्थ्यांची शेवटच्या सत्रातील परीक्षा घेण्याबाबत सांगितलं होतं. मात्र आता परीक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपविली पाहिजे यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यादृष्टीने विविध पर्याय पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यापीठांच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसंच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करण्यााबाबचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


परीक्षांबाबतच्या अनिश्चितता संपविण्याचा विषय प्राधान्याने हाताळून राज्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील परीक्षेच्या अनिश्चिततेची भिती संपविण्याच्या दृष्टीने नियोजन करावं लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र जुलैमध्ये परीक्षा शक्य नाही हे स्पष्ट होऊ लागले आहे. 


शिक्षण जीवनावश्यक असून महाराष्ट्रात शिक्षणाच्या दर्जामध्ये सगळीकडे समानता असायला पाहिजे, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. शिक्षण सुलभ कसं करता येईल, साक्षरतेचे प्रमाण कसं वाढवता येईल, त्या दृष्टीने पाऊलं टाकावी लागतील. आदिवासींपर्यंतही शिक्षणाच्या चांगल्या सुविधा पोहचवता आल्या पाहिजेत. त्यासाठी ई-लर्निंग, डिजिटल क्लास रुम्स अशा पर्यांयाचही विचार करावा करुन शिक्षणाचा दर्जा उंचावून तो एक समान, सर्वोत्तमच असायला हवा. महाराष्ट्र शंभर टक्के साक्षर झाला पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.


परीक्षा घ्याव्यात याच दृष्टीने पर्यांयाचा विचार केला जात असून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही विचार करत असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.