Lockdown : पंतप्रधानांकडे उद्धव ठाकरेंच्या `या` महत्त्वाच्या मागण्या
मुख्यमंत्र्यांनी यावेळी....
मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू असणाऱ्या Lockdown लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पयातच विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सोमवारी दीर्घ काळासाठी चर्चा झाली. यामध्ये देशातील कोरोनाची सद्यस्थिती आणि त्यावर आधारित भविष्यातील महत्त्वाच्या निर्णयांवर प्रकाशझोत टाकला गेला.
कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पाही आता अखेरच्या काही दिवसांमध्ये आहे. त्याच धर्तीवर एकंदर परिस्थिती पाहता मुंबईत लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे आग्रही भूमिका मांडली.
मोठी बातमी : 'मुंबई लोकल ट्रेन सुरु करा'
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या काही महत्त्वाच्या मागण्या खालीलप्रमाणे...
- मुंबईमध्येही उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी आणि केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी.
- लॉकडाऊनबाबत काळजीपूर्वक निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
- राज्यात कोरोनाचा कहर होण्याआधी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना सुरु होती. पण, विदर्भासारख्या जिल्ह्यांमध्ये निवडणुकांमुळे या योजनेचा फायदा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळावं यासाठी रिझर्व्ह बँकेला केंद्राने सुचना द्याव्या. जवळपास १० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
- सध्या राज्याला ३५ हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. तेव्हा जीएसटी परताव्यापोटी आणि केंद्रीय कराच्या भागापोटी संपूर्ण रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी.
- पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेत काम करणारे अनेकजण अहोरात्र या प्रसंगी त्यांची अविरत सेवा देत आहेत. पण, कायदा आणि सुव्यवस्था पाहणाऱ्या पोलिसांनाही विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे गरज भासल्यास केंद्राने महाराष्ट्राला मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावं. यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होईल.
मुंबईसह राज्यातील संपूर्ण परिस्थितीची संक्षिप्त माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना देत त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा केली.