मुंबई : यापुढे एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्योजकांना दिलं आहे. तसंच उद्योग उभारणीसाठी घ्याव्या लागणार्‍या विविध परवानग्यांबाबत सुटसुटीतपणा आणणार, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. प्रकल्प वेगानं पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांची उद्योगपतींबरोबर मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला रतन टाटा, मुकेश अंबानी, बाबा कल्याणी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांबरोबर उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत उद्योजकांनीही काही सूचना केल्या तर आदित्य ठाकरेंनीही पर्यटनाच्या दृष्टीनं काही कल्पना मांडल्या. नोव्हेंबर २०२० मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र या उद्योग मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. 



उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं की, 'सर्व उद्योजनकांनी बैठकीत अनेक चांगल्या सूचना केल्या. महाराष्ट्राबदलचे विचार, उद्योगवाढीसाठी काही अपेक्षा व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी यावर उद्योजकांना आश्वासन दिलं सरकार चांगलं औद्योगिक वातावरण तयार करेल. उद्योगांसाठी लागणारे परवानग्या सुलभ कशा करता येईल. याकडे लक्ष देऊ.'


'आदित्य ठाकरे यांनी देखील काही कल्पना मांडल्या. मुंबईतील पर्यटक कसं वाढेल यासाठी त्यांनी काही सूचना केल्या. उद्योगपतींच्या सहकार्याने राबवण्याचा इरादा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. गुंतवणूक वाढवावी यासाठी आव्हान केलं आहे.' अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.