दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लॉकडाऊनला विरोध होत असला तरी दडपणाला बळी पडू नका, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत घेतली आहे. गरज असेल तिकडे लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या बैठकीत दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात लॉकडाऊन केले आहे. त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे परिणामत: मृत्यू दर लक्षणीयरित्या कमी करणे यासाठी झाला पाहिजे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा सहभाग मिळवून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्याना सांगितले. मुख्यमंत्री जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत होते. 


'लॉकडाऊन लावून रोगाला अटकाव करण्याची खात्री असेल, तर विश्वासाने पण तारतम्याने निर्णय घ्या. कुणाच्याही दडपणाखाली येऊ नका. प्रशासनातल्या सर्व यंत्रणांनी घट्टपणे हातात हात घालून काम केले पाहिजे. सरकारच्या वेळोवेळी सुचना येतात. प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढू नये', असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच धार्मिक, समाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम ठेवली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 


'सणवार साजरे करतांना नवे कंटेनमेंट क्षेत्र वाढू नये. काही दिवसांपूर्वी धारावीच्या मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. मुंबईने अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम केले आहे. कुठलीही माहिती लपविली नाही. हे संकट किती भीषण आहे आणि त्याचा मुकाबला राज्य सरकारने कसा केला हे देखील आपण नागरिकांना विश्वासात घेऊन मोकळेपणाने सांगितले आहे. धारावीसारखा परिणाम आपल्याला राज्यात इतरत्रही दाखवता येऊ शकेल', असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.