मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधित करत निसर्ग या चक्रीयवादळापासून सावध राहण्यासाठी घरातच राहण्याचं आवाहन केलं. तसेच राज्यात केलेल्या उपाययोजनांची माहिती देखील त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, लोकांच्या हिमतीला सलाम करतो. संकटाच्या छाताडावर चाल करून जायचं आहे.. महत्वाची कागदपत्रे, सामान व्यवस्थित ठेवा. बॅटरीवर चालणाऱ्या वस्तू वेळेत चार्ज करून ठेवा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम उपचार पेटी तयार ठेवा आवश्यक औषध गोळ्या सोबत ठेवा. जनावरांना बांधून न ठेवता मोकळं सोडा. प्रशासनाने सूचित केलेल्या जागीच आडोसा घ्या. काही भागात वीजपुरवठा खंडित करावा लागणार आहे. वाऱ्याचा वेग खूप असेल त्यामुळे अधिक काळजी घ्या. 125 किमी प्रति तास वेगाने वादळ येणार असल्याने तात्पुरत्या शेडखाली आडोसा घेऊ नका. अलिबागला हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस समुद्रकिनारी जाऊ नका असा सूचना मच्छिमारांना देखील देण्यात आल्या आहेत.


केंद्र सरकारने मदतीचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील यंत्रणा सज्ज असून एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कोणीही घराबाहेर पडू नका. असं आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे.