`अभिनयाने `भरदास्तपणा` मिळवून देणाऱ्या अभिनेत्याला मुकलो`
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई : आपल्या अभिनयाने 'भरदास्तपणा' मिळवून देणाऱ्या अभिनेत्याला मुकलो... असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी रवी पटवर्धन यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. रवी पटवर्धन यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. निधनानंतर चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने "भारदस्तपणा" मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत..अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पटवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रवी पटवर्धन हे ८३ वर्षांचे होते. ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना शनिवारी रात्री त्यांना श्वास घेण्यात त्रास जाणवत होता. याआधी नोव्हेंबरमध्ये त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता.
त्यांनी आतापर्यंत दीडशेहून अधिक नाटकांमध्ये आणि २०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्यांच्या रूबाबदार व्यक्तीमत्त्वामुळे त्यांना 'गावचा पाटील', पोलीस आयुक्त, न्यायाधीश अशा एक ना अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली.