शिवसेना स्टाईलने उत्तर देणाऱ्या युवा सैनिकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोपटली पाठ
नारायण राणेंच्या अटकेनंतर शिवसैनिकांचा जल्लोष, मुंबईत फोडले फटाके
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. राज्यभरात शिवसैनिकाकांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युवा सैनिकांची पाठ थोपटली. आज युवा सैनिकांनी शिवसेना स्टाईल केलेल्या आंदोलनाचे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं.
दरम्यान, दुपारी नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला. मुंबईतल्या भारतमाता आणि कुलाब्यातल्या शिवालय इथं शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. राणेंच्या अटकेनंतर शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केलाय.
वक्तव्याचे राज्यभरात पडसाद
नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर आज राज्यभरात प्रचंड गोंधळ माजला. मुंबईत जुहू इथल्या नारायण राणेंच्या बंगल्यावर शिवसैनिकांनी कूच केली. याची आधीच कल्पना असल्यानं बंगल्यावर भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं जमा झाले होते. हाणामारीची शक्यता गृहित धरून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. शिवसैनिकांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
पुण्यात नारायण राणेंच्या आर डेक्कन मॉलवर शिवसैनिकांनी तुफानी दगडफेक केली. त्यामुळे मॉल बंद करावा लागला. नाशिकच्या शालिमार चौकात शिवसेना कार्यालयासमोर दगडफेक झाली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं तणाव वाढला. कल्याणला अहिल्याबाई चौकातल्या भाजप कार्यालयात तोडफोड झाली. तर अमरावतीमध्येही भाजप कार्यालयासमोर शिवसैनिकांनी पोस्टर जाळली.
दिल्लीतही उमटले पडसाद
राणेंच्या वक्तव्याचे दिल्लीतही पडसाद उमटले. शिवसेना दिल्ली प्रदेश कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या दिल्लीतील 28 अकबह रोडवरील निवासस्थान समोर आंदोलन केलं.