मुंबई : नागरिकत्व विधेयकाबाबत शिवसेनेची वेगवेगळी भूमिका पाहायला मिळत आहे. काल या विधेयकाला शिवसेनेने लोकसभेत समर्थन दिले. त्यामुळे शिवसेनेची भूमिका काय, असा थेट प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावेळी आम्ही राज्यसभेत नागरिकत्व विधेयकाला समर्थन देणार नाही, असे स्पष्ट केले. मी राज्यसभा सदस्यांकडून याची माहिती मागवली आहे. त्यावर विचार करुन अधिकची भूमिका स्पष्ट करेन असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नव्या विधेयकाबाबत स्पष्टता आल्याशिवाय शिवसेना राज्यसभेत मतदान होणार नाही. शिवसेनेने काय भूमिका घ्यावी, हे कोणीही शिवसेनेला शिकवू नये. शिवसेनेने आपली सतत आपली भूमिका मांडली आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेनेने लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेत.


आमच्यासारखे सर्वच पक्ष देशहित डोळ्यासमोर ठेवून काम करतील. या विधेयकाबाबत अधिक स्पष्टता येणे आवश्यक आहे. राज्यसभेत हे विधेयक मांडले जाण्यापूर्वी त्यामध्ये सूचवलेल्या सूचनांची दखल घेणे आवश्यक आहे. तसेच अधिक स्पष्टता येत नाही तोवर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार नसल्याचेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.


दरम्यान, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम विचारधारांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशहितासाठी आणण्यात आले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीयत्वाला धरुन ते असल्याने शिवसेनेने याला पाठींबा दिला आहे, असेही ते म्हणाले होते.