अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री विधानपरिषदेत बोलत होते. 'केंद्राकडून हक्काचे पैसे येत नाहीयेत, उलट कर्ज घ्या, असं सांगत आहेत. राज्य आणखी कर्जबाजारी होणार आहे, किमान याबाबतीत तरी केंद्राला जाब विचारणार आहात का नाही? पंतप्रधानांना जाब विचारण्याची हिंमत आहे का?', असा सवाल मुख्यमंत्र्यांनी भाजपला विचारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आम्ही टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन करत असताना पंतप्रधानांनी एका फटक्यात सर्व बंद केलं. आता तुमचं तुम्हील आत्मनिर्भर व्हा, सर्व नाड्या आवळून धरतात, मग म्हणतात श्वास घ्या,' अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. थाळ्या बडवल्या म्हणजे कोरोना गेला, असं कोणाला वाटलं होतं. मात्र यामुळे अत्यावश्यक सेवेशी संबंधित लोकांना पाठिंबा दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले


'विरोधी पक्षनेत्यांनी जी चिंता व्यक्त केली ती महत्त्वाची आहे. WHOनेही आणखी मोठं संकट येईल असं म्हटलं आहे. विरोधक एकीकडे असं म्हणत आहेत, मग उद्या जाऊन मंदीर उघडा वगैरे असं म्हणू नका, सहकार्य करा', असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.


विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनाही प्रत्युत्तर दिलं. तुम्ही ९७ पत्र पाठवलीत आणि उत्तर दिलं नसेल, तर क्षमा करा. यापुढे प्रत्येक पत्राला उत्तर दिलं जाईल. त्यापेक्षा प्रत्येक पत्राबाबत कारवाई करत आहेत, हे महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्री प्रविण दरेकरांना म्हणाले. जर चीनने १५ दिवसात जम्बो हॉस्पिटल उभं केलं, तर राज्याने देशात सगळ्यात आधी जम्बो हॉस्पिटल उघडल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.