मुंबई: कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी विनंती शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे. त्यांचे कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा  'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असा नामविस्तार करावा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. तसेच राज्याच्या सर्व आदरणीय महापुरुष व दैवतांच्या नावाने असणाऱ्या शासकीय योजना, कार्यक्रम व ठिकाणे यांचा नामविस्तार करून त्यांच्या संपूर्ण नावाचा उल्लेख करण्याच्या दृष्टीने बदल करण्याचा मानस यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे यांनीही शिवाजी महाराजांच्या एकेरी नावाचा उल्लेख टाळण्यासाठी महाराष्ट्रातील सार्वजनिक स्थळांचा नामविस्तार करण्यात यावा, अशी मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. मी या दोघांनाही समज दिली होती. यावर दोघांनीही दिलगिरीही व्यक्त केली. मात्र, असे प्रकार सातत्याने घडत राहिले तर ते चुकीचे ठरेल. 



त्यामुळे आपण महाराष्ट्रातूनच या गोष्टी टाळण्यासाठी सुरुवात करू. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ किंवा शिवाजी नगर यासारख्या सार्वजनिक स्थळांचा नामविस्तार करावा. शिवाजी नावापुढे महाराज ही उपाधी लावावी. जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज नगर असा उल्लेख केला जाईल. त्यामुळे शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख टळेल, असे मत संभाजीराजे यांनी व्यक्त केले होते.