हे काही स्वातंत्र्ययुद्ध नाही! दहीहंडी उत्सवावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना टोला
कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवावर राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. पण हे निर्बंध झुगारत मनसेने काही ठिकाणी दहीहंडीचा उत्सव साजरा केला. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निर्बंधांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. तुमची बाहेर पडत नाही, त्यामध्ये आमचा काय दोष, असा सवाल विचारत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाण्यामध्ये एका कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फ्रंसिंगच्या माध्यमातून संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी नियम मोडून दहीहंडी (Dahihandi) साजरी करणाऱ्या मनसेला आणि राज ठाकरेंना टोला लगावला. 'आज काही जणांनी दहीहंडी साजरी केली. हे करा नाही तर आम्ही अमूक करू, पण हे काही स्वातंत्र्ययुद्ध नाही. ज्यामध्ये कोरोनाचे नियम मोडले आणि आम्ही करून दाखवलं. तुम्ही काही स्वातंत्र्य नाही मिळवलंय. त्यासाठी आंदोलन केलं असतं तर तो भाग वेगळा होता, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोनाचे जे काही नियम आपल्याला पाळावे लागतायत, ते नियम सरकारने का ठरवले, कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सुनावलं.
जन आशीर्वाद यात्रेवर अप्रत्यक्षरित्या टीका
जनआशीर्वाद यात्रा काढणाऱ्या भाजपावरही मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका समोर असताना यांना यात्रा काढायच्या आहेत. जनता जगली काय?, त्यांचे प्राण गेले काय? आम्हाला 100 टक्के राजकारण करायचं आहे. जनतेचे जीव धोक्यात येऊ शकतील, असे सभा समारंभ करायचे आहेत. का तर, आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहीजे आहेत. कशाला आशीर्वाद?, जनतेचे जीव धोक्यात घालायला. या सर्व घाणरड्या राजकारणापासून बाजूला राहून आपण सगळेजण जनतेच्या हिताची कामं करत आहोत. तुमचं कौतुक करतो.”, अशी अप्रत्यक्षरित्या टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रेवर केली.