Mumbai Coastal Road: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची व दिलासादायक बातमी समोर येते आहे. बुधवारपासून लोटस जंक्शन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रजनी पटेल चौकाच्या एंट्री पॉइंटपासून मुंबई कोस्टल रोडच्या दिशेने जाणाऱ्या कॅरेजवेवर रहदारीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या बदलामुळं आता कोस्टल रोड 16 तास खुला राहणार आहे. त्याचबरोबर, आठवड्यातील सातही दिवस कोस्टल रोडवरुन वाहतुक करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवड्यातून सातही दिवस अमरसन गार्डन जंक्शनवर प्रवेश आणि एक्झिट व मरीन ड्राइव्ह येथून बाहेर पडण्याची वेळ सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी वरळीतील दोन जंक्शनमधून वाहतुकीचा वेळ सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंतच होता. तर, विकेंडला या मार्गावर वाहतुकीची परवानगी नव्हती. आता सागरी किनारा प्रकल्प जूनमध्ये पूर्ण क्षमतेने खुला होण्याची शक्यता आहे. 


16 तास वाहतुकीस खुला


कोस्टल रोडवर दररोज वाहतुकीचा वेळ वाढवण्यात येत आहे. आता वाहनचालक आठवड्यातील सातही दिवस 16 तास कोस्टल रोडवरुन प्रवास करु शकतात. मात्र, वरळीत बिंदू माधव ठाकरे जंक्शनकडून सकाळी 8 ते संध्याकाळी 5पर्यंतच वाहतुकीची परवानगी असणार आहे. वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते यासाठी कंत्राटदार आणि ठेकेदारांनी प्रवासाचा वेळ वाढवण्यास विनंती केली होता. कारण, उत्तरेकडे जाणाऱ्या बोगद्याची प्रमुख यांत्रिक स्थापनेचे काम सुरू आहे. रीअल टाइम चाचणी आणि विविध प्रणालींची पर्याप्तता तपासण्यासाठी ही वाहतुक सुरू करण्यात आली आहे. 


वेगमर्यादा


कोस्टल रोडवर प्रवासासाठी वेगमर्यादा निश्चित केली आहे. सरळ रस्ता असेल तर वाहनाचा वेग 80 किमी, बोगदा असेल तर 60 किमी आणि वळणाचा रस्ता असेल तर 40 किमी प्रतितास अशी वेगमर्यादा असेल. तर, वाहतुक पोलिसांनी कोस्टल रोडवर सर्व अवजड वाहनांना, ट्रेलर, मिक्सर, माल वाहतुक करणाऱ्या ट्रकना प्रवेशबंदी घातली आहे. तर, बेस्ट, एसटी, माल वाहतुक करणाऱ्या गाड्या, दुचाकी, सायकल, दिव्यांग व्यक्तींची मोटरसायकल, स्कुटर, तिनचाकी वाहने यांना परवानगी आहे. 


फोटो व व्हिडिओ घेणाऱ्यांवर कारवाई 


फोटो व व्हिडिओ घेण्यासाठी कोस्टल रोडवर थांबणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. तसंच, येत्या जूनपर्यंत संपूर्ण मुंबई कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे. मरीन ड्राइव्ह ते वरळी या 10.58 किमी लांबीच्या कोस्टल रोडचे संपूर्ण काम जून 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणास्तव प्रकल्पाचे काम पुढे पुढे रेंगाळत जात आहे. त्यामुळं पुढील महिन्यात कोस्टर रोड वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.