राज्यात थंडीचा कडाका, पुढील तीन दिवसांत थंडीची लाट
महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. पुढील तीन दिवस थंडीची लाट येण्याचा आहे.
मुंबई : महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. येत्या काही दिवसांत नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील तीन दिवस थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. त्याचा परिणाम हा राज्यातील हवामानावर झाला आहे. त्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता अधिक आहे.
पुढचे तीन ते चार दिवस राज्यात थंडीचा मुक्काम कायम राहणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात दोन दिवसांपासून गारवा जाणवत आहे. हीच स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. तर २६ ते २८ असे तीन दिवस उत्तर मध्य महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये काही ठिकाणी शीत लहरीची शक्यता आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात २७ तारखेच्या दरम्यान तुरळक पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.