मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस खाली घसरत आहे. शनिवारी पहाटेदेखील याचा प्रत्यय आला. धुळे शहरासह जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा जोर वाढत चालला आहे. धुळ्यात २७ वर्षातील निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. जिल्ह्याच्या इतिहासात सगळ्यात कमी म्हणजे २.२ अंश से. तापमान नोंदवण्यात आले. थंडीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले. यापूर्वी १९९१ मध्ये जिल्ह्यात २.३ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर २०१७ मध्ये तापमान ५.४ नोंदवले गेले होते. शहरासह जिल्ह्यात संध्याकाळी पाचपासून  थंडीचा जोर वाढत असून सकाळी आठ वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.काही दिवसांपूर्वीच निफाडमध्ये १.८ सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. वाढत्या थंडीमुळे रब्बीच्या गहू आणि हरभरा या पिकांना मात्र लाभ होताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


महाबळेश्वर गोठले


थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरला राज्यातून तसेच परराज्यातून  दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. गेल्या दोन दिवसांपासून येथील तापमानाचा पारा कमालीचा घसरलाय. पारा चार अंशांच्या खाली गेलाय. वेण्णा लेक, लिंगमाळा परिसरात तापमान आणखीनच खाली गेल्याने दवबिंदू गोठून बर्फ तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


काही दिवसांपूर्वीच पुणे वेधशाळेने राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशाराही दिला होता. ओखी चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, स्थानिक पातळीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे नोव्हेंबरनंतर थंडी गायब झाल्याचे चित्र होते. मात्र, उत्तर भारतातील थंड प्रवाह राज्यात येत असल्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात थंडीचा कडाका पुन्हा वाढला होता. कधी नव्हे ते मुंबईतही कमालीची थंडी अनुभवायला मिळत आहे.