पियुष गोयलांच्या मुलाचे भाषण ऐकण्याची कॉलेजियन्सना सक्ती? आदित्य ठाकरे संतापले
Piyush Goyals Sons Show: मुंबई उपनगरातील ठाकूर महाविद्यालयातील एक कथित व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय.
Piyush Goyals Sons Show: मुंबई उपनगरातील ठाकूर महाविद्यालयातील एक कथित व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय. यामध्ये भाजप नेते पियुष गोयल यांच्या मुलाचा कार्यक्रमाला जास्त गर्दी दिसावी यासाठी मुलांचे आयकार्ड जप्त केल्याचा आरोप करण्यात आलाय. कॉलेजचे विद्यार्थी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी उडी घेत भाजपवर हल्लाबोल केलाय. काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.
देशात लोकशाहीचा गळा घोटू पाहणाऱ्या भाजपचा बुरखा ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी टराटरा फाडला. विद्यार्थ्यांची ओळखपत्रे जप्त करुन परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांना हजेरीची सक्ती करणाऱ्या या पक्षाच्या हाती देशाचे भवितव्य कसे सुरक्षित असेल? असा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने विचारण्यात आलाय.
कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे आयडी जप्त
यापुढे देशात लोकशाही रहावी अशी राजवटीची इच्छा नाही. जगाला हाच संदेश राजवट देतेय, असा हल्लाबोल आमदार आदित्य ठाकरे यांना केलाय. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे आयडी जप्त करण्यात आले होते. परीक्षेच्या एक दिवस आधी उत्तर मुंबईतील भाजप उमेदवाराच्या मुलाच्या भाषणात उपस्थित राहण्यास विद्यार्थ्यांना भाग पाडण्यात आले, असे ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
कारण साहजिक आहे. उत्तीर्ण होऊनही या सरकारमध्ये नोकऱ्या कुठे आहेत? त्यापेक्षा उमेदवारांच्या मुलांनी घेतलेल्या व्याख्यानांवर त्यांचा वेळ वाया घालवा. अशा भयंकर कृत्यासाठी मुख्याध्यापकांना निलंबित केले जाईल का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारलाय.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
मुंबई उपनगरातील ठाकूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पियुष गोयल यांच्या मुलाचे भाषण ऐकण्याची सक्ती केली. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी बंड करून अशा प्रकारे भाषण ऐकण्याची जबरदस्ती करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतल्याची माहिती आव्हाडांनी दिली.
ठिणगी पडली आहे
विद्यार्थ्यांची संख्या किती अधिक आहे ते व्हिडीओ पाहून तुम्हाला दिसेल! याचा अर्थ ठिणगी पडली आहे. जेव्हा विद्यार्थ्यांचा विरोध सुरू होतो तेव्हा भले भले अडचणीत येतात. 1973-74 मध्ये विद्यार्थी वर्गाचे बिहार आणि गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन सुरू झाले आणि लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर असलेल्या इंदिरा गांधी यांचा आलेख उतरू लागला. कालांतराने काय झाले, हा इतिहास असल्याची आठवण आव्हाडांनी करुन दिली.
क्रांतीची नांदी
विद्यार्थी जेव्हा पेटून उठतो तेव्हा ती क्रांतीची नांदी असते. ठाकूर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांचे हे बंड केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार!तुम्हीच आता देशाला मार्ग दाखवाल, अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी व्यक्त केली.