केतकी चितळे हाजीर हो! आतापर्यंत एकूण 15 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणे अभिनेत्री केतकी चितळे हिला चांगलेच महागात पडले आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणे अभिनेत्री केतकी चितळे ( Ketki Chitle ) हिला चांगलेच महागात पडले आहे. केतकीला ठाणे पोलिसांनी ( Thane Police ) ताब्यात घेतले. त्यानंतर सुट्टीच्या न्यायालयासमोर तिला हजर करण्यात आले.
पोलिसांनी केतकी हिची अधिक चौकशी करणे गरजेचे असल्यामुळे पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. तर, यावेळी केतकी हिने स्वतः न्यायालयात आपली बाजू मांडली.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सुट्टीच्या न्यायालयाने केतकी हिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या केतकी पोलीस कोठडीत असून तिची पोलीस चौकशी करत आहेत.
दरम्यान, शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरोधात एकूण 15 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोरेगाव, पवई, भोईवाडा, कळवा, नेरूळ, पुणे, पिंपरी चिंचवड, देहूरोड, नाशिक, धुळे, अकोला, अमरावती, जळगाव, सातारा, उस्मानाबाद येथील पोलीस ठाण्यात हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सध्या केतकी ठाणे पोलिसांच्या ताब्यात असून १८ मे पर्यत पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे यानंतर तिला जमीन मिळाल्यास जेथे जेथे तिच्याविरोधात एफआयआर नोंद करण्यात आला आहे त्या त्या पोलीस ठाण्यात तिला चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. या सर्व घटनेमुळे केतकी चितळे हिच्या अडचणीत आणखीनच वाढ होणार आहे.