नवी दिल्ली: दिल्लीच्या निझामुद्दीन परिसरातील मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमावरून देशभरात धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. त्यांनी सोमवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निझामुद्दीन मरकजवरून देशभरात निर्माण झालेल्या वातावरणाविषयी चिंता व्यक्त केली. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा कार्यक्रम महाराष्ट्रात होणार होता. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तत्परता दाखवून या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. दिल्लीतही केंद्र सरकारने तशीच तत्परता दाखवायला पाहिजे होती. जेणेकरून देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली नसती, असे पवार यांनी म्हटले. टेलिव्हिजन आणि अन्य माध्यमातून सातत्याने दिल्लीतील या घटनेविषयी गोष्टी दाखवून एका समुदायाविरोधात वातावरणनिर्मिती होत आहे. केंद्र सरकारने त्यावेळीच काळजी घेतली असती तर अशी वातावरणनिर्मिती करण्याची संधी मिळाली नसती. 


'तबलिगी जमातचा कार्यक्रम झाला नसता तर देशातील परिस्थिती वेगळी असती'

महाराष्ट्रातही सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात बैल आणि घोड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. या शर्यती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दीही केली होती. मात्र, स्थानिक पोलिसांनी त्यावेळी तत्परता दाखवून या शर्यती रोखल्या. एवढेच नव्हे तर शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांवर गुन्हेही दाखल केले, याकडे पवारांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर देशासमोर अर्थव्यवस्थेवरील विपरीत परिणाम आणि बेरोजगारीचे संकट उभे राहणार असल्याचा इशाराही यावेळी शरद पवार यांनी दिला. त्यासाठी आत्तापासूनच विचार करायला पाहिजे. यादृष्टीने महाराष्ट्रात आर्थिक जाणकारांची एक टास्क फोर्स स्थापन करावी, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचे पवारांनी सांगितले. राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही टास्क फोर्स पुढील सहा महिने ते वर्षभराच्या काळातील रणनीती निश्चित करेल, असेही शरद पवार यांनी सांगितले.