मध्य रेल्वेच्या प्रवाशांनो त्रासासाठी तयार राहा, मोटरमन्सचे असहकार आंदोलन
600 फेऱ्या रद्द होण्याची शक्यता
मुंबई: एरवी नित्यनियमाने होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे अडचणींचा सामना करत असलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या मनस्तापात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाच्या एका निर्णयामुळे मोटरमन्सनी असहकार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामध्ये बहुतांश करुन मध्य रेल्वेवरील मोटरमन्सचा समावेश आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात रेल्वेच्या ६०० फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे. परिणामी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासनाने नियमांनुसार लाल सिग्नलच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या २४ मोटरमन्सवर नुकतीच कारवाई केली होती. या सर्वांना सक्तीची निवृत्ती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र, हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत मोटरमन्सच्या संघटनेने असहकार आंदोलन पुकारले आहे.
रेल्वेतील मोटरमनच्या 898 मंजूर पदांपैकी 229 पदे रिक्त आहेत. यामुळे सद्यस्थितीत रेल्वेच्या फेऱ्या सुरळीत पार पडण्यासाठी मोटरमनला ओव्हर टाइम करावा लागतो. परिणामी ओव्हर टाइम न केल्यास मध्य रेल्वेच्या सुमारे 150 पेक्षा जास्त फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान मध्य रेल्वे आणि मोटरमन युनियन यांच्यात या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी गुरुवारी रात्री साडे दहा वाजेपर्यंत बैठक सुरू होती. मात्र चर्चा निष्फल ठरल्यामुळे शुक्रवारी सकाळी चर्चेअंती निर्णय घेणार असून आम्ही आमच्या घोषणेवर ठाम असल्याचे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने सांगितले आहे.
मोटरमन्सला पूर्ण आठवड्यात 104 तास काम करावे लागते. यापेक्षा जास्त काम केल्यास तो ओव्हरटाईम गृहीत धरला जातो. या ओव्हरटाईम च्या बदल्यात मोटरमनला वरिष्ठतेनुसार 700 ते 1200 रुपये प्रतितास इतके वेतन मिळते.गेल्या काही महिन्यात 3 घटना अश्या झाल्या ज्यामध्ये युनियनशी निगडित मोटरमन ने सिग्नल ओलांडून गाड्या पुढे नेल्या. त्यांच्यावरील कारवाई रद्द करावी यासाठी एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न या युनियन्स कडून केला जात आहे,मोटर मन च्या या पावित्र्यामुळे आज सकाळ पासून मध्य रेल्वे च्या नऊ फेऱ्या रद्द झाल्या आहेत.