मुंबई : परळ-एलफिन्स्टन दुर्घटनाप्रकरणात मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची आर्थिक मदत तर जखमींवर मोफत उपचाराची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातात एकूण २२ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. त्यात १८ पुरूष आणि ४ महिलांचा मॄत्यू झाल्याची माहिती आहे. तर ३५ जण जखमी झाले आहेत. मॄतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेचं परळ स्टेशन आणि पश्चिम रेल्वेचं एलफिन्स्टन स्टेशन यांना जोडणाऱ्या पुलावर आज सकाळी चेंगराचेंगरी होऊन २२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. 



सकाळी साडेदहाच्या सुमारास मध्य मुंबईत पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक प्रवासी पुलावरच थांबले होते. अशातच, परळ आणि एलफिन्स्टन दोन्ही स्टेशनांवर एकापाठोपाठ लोकल ट्रेन येत होत्या आणि पुलावरची गर्दी वाढतच होती. अशातच, पुलाचा पत्रा तुटल्याचा मोठा आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाली, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.


दरम्यान, जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह आणि एबी निगेटिव्ह ब्लडची केईएममध्ये गरज असल्याची डॉक्टरांची माहिती दिली आहे.