कृष्णात पाटील/ मुंबई : सोसायटीतील दोन गटांच्या वादात रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आता एसआरए स्वत:च विकासक होवून पूर्ण करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील सुमारे दोनशेहून अधिक एसआरए प्रकल्प हे सोसायटींमधील अंतर्गत वादामुळं पूर्ण होत नाहीयत. ज्यामुळं अनेक प्रामाणिक आणि गरजू लोक घरापासून वंचित राहिलेत. यातून मार्ग काढण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने रखडलेले प्रकल्प स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.


झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यासाठी विकासकाची नेमणूक करताना क्वचितच एका नावावर सहमती होते, अन्यथा विकासक नेमण्यावरून सोसायट्यांमध्ये दोन तीन गट पडल्याचे सर्रास चित्र पहायला मिळते. ज्यामुळं झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने बांधकाम परवाना दिल्यानंतरही८-१० वर्षे प्रकल्प रखडलेले आहेत. 


एकाच एसआरए प्रकल्पात दोन तीन बिल्डरांनी रस दाखवल्यानंतर अशा प्रकारचे चित्र निर्माण होते. यात भांडखोर सभासद वाद घालत बसतात, परंतु सामान्य गरजू रहिवाशी मात्र घरापासून वंचित राहतायत. त्यामुळंच एसआरएनं असे रखडलेले प्रकल्प स्वत;च पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. 


बिल्डरांनीही सुमारे ४०० हून अधिक एसआरए प्रकल्प रखडवलेले आहेत. ज्यांना एसआरएने नोटीसा पाठवून प्रकल्प सुरु करण्याची मुदत दिली आहे. अन्यथा बिल्डर बदलण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहेत.


मुंबईत एसआरए प्रकल्प पूर्ण होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळं आता रखडलेले प्रकल्प तरी मार्गी लागावेत यासाठी प्राधिकरण प्रयत्न करत आहे. अनेक वर्षे घरांचे स्वप्न पाहणाऱ्या रहिवाशांसाठी नक्कीच हा दिलासा आहे. आता एसआरएनं या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आणखी काही वर्षे वाट पाहू नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.